पुणे | ९ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महा उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत पुण्यात विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेतील शरदचंद्रजी पवार सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेत ‘महा उपलब्धी’ ॲपची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती डिजिटल माध्यमातून सहज मिळावी आणि विविध कामांसाठी सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे जिल्ह्याच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी गायत्री तुकाराम जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लेखा व कोषागारे संचालनालयाचे उपसंचालक (निवृत्तीवेतन) प्रमोद पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी प्रशांत डोंगरे आणि पुणे विभागाच्या सहसंचालक भारती देशमुख उपस्थित होत्या.
ॲपची नोंदणी आणि वापराबाबत मार्गदर्शन
कार्यशाळेत प्रशांत डोंगरे यांनी ‘महा उपलब्धी’ ॲपचे महत्त्व, उपलब्ध सुविधा आणि नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. निवृत्तीवेतनविषयक सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी डिजिटल सुविधांचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांनी या ॲपचा वापर करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
राज्य निवृत्तीवेतन संघटनेतर्फे गौरव
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा गायत्री जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, ‘महा उपलब्धी’ ॲप सुरू केल्याबद्दल राज्य निवृत्तीवेतन संघटनेच्या वतीने लेखा व कोषागारे संचालनालयाच्या संचालक दीपा देशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करता यावा आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक सहजपणे मिळावा, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहायक संचालक (निवृत्तीवेतन) देवराम शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.