पंढरपूर वारीवरील माहितीपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान

पंढरपूर वारीवरील माहितीपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान

मुंबई | ९ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आणि पंढरपूरच्या आषाढी वारीचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवणाऱ्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून माहिती व जनसंपर्क विभागाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त माध्यमातून तयार करण्यात आलेला हा माहितीपट २२ मिनिटांचा असून इंग्रजी भाषेत आहे. डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण करण्यात आले आहे.

या माहितीपटातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा परिचय जागतिक प्रेक्षकांना करून देण्यात आला आहे. भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करण्यात आला आहे.

या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे अभिनंदन केले. पंढरपूरची वारी ही जात, धर्म आणि आर्थिक परिस्थितीचा भेद न करता सर्वांना एकत्र आणणारी प्राचीन भक्तीपरंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. या परंपरेचे महत्त्व जगभर पोहोचविण्यासाठी माहितीपट तयार करण्यात आला असून नागरिकांनी तो पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

या बहुमानामुळे महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, संतसाहित्य आणि सामाजिक समतेचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाल्याचे सिंह यांनी नमूद केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories