राज्यातील चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या महिनाभरात, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
पिंपरी, ता. ७ - गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-शिरुर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि नाशिक फाटा-खेड.....या चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या महिनाभरात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. ६) पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नितीन गडकरी शुक्रवारी पुण्यात होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील प्रकल्प, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (एमएसआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदी विभागांकडील प्रस्तावित असलेल्या महामार्गाच्या कामांचा आढावा घेत सद्यःस्थिती जाणून घेतली. विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले, ''पुणे-शिरुर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महिनाभरात भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत महामार्गावर उड्डाणपूल असणार आहे. त्यामध्ये खराडी-विठ्ठलवाडीदरम्यान देशातील सर्वाधिक लांबीचा म्हणजे ३१ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. पुणे-शिरूर महामार्ग पुढे छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणार आहे. अहिल्यानगर शहराच्या बाहेरुन जाणारा हा मार्ग असेल. शिरुर-छत्रपती संभाजीनगर हे अंतर सुमारे १९२ किलोमीटर आहे. यासाठी १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे.''
''पुढील महिन्यात पालखी मार्गाची पाहणी करणार असून, त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अटल सेतू मार्गाला पुढे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने महामार्गाचे उद्घाटन मी करणार नाही.'', असे गडकरी यांनी सांगितले.
नाशिक फाटा-खेडदरम्यान महामार्ग करण्यात येणार आहे. आगामी काळात उपनगरांसह ग्रामीण भागात मेट्रोचा विस्तार होणार आहे. त्यामुळे महामार्गावर उड्डाणपूल करताना खांबाची रचना मेट्रोचा विचार करुनच करा. हडपसर-यवत, नन्हे-रावेत महामार्गावर उड्डाणपूल उभारताना मेट्रोचाही विचार करावा, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या.