माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची चौकशी करावी, आमदार सचिन अहिर यांची मागणी
माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची चौकशी करावी, आमदार सचिन अहिर यांची मागणी
पिंपरी, ता. २८ - महापालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता मकरंद निकम यांनी जानेवारी २०२६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. महापालिका निवडणुकी दरम्यानही निकम यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा विषय चर्चेत होता.
आता शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान भवनात निकम यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सचिन अहिर यांनी म्हटले आहे की, ''पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कारकिर्दीतील निर्णय वादग्रस्त आहे. अनेक नगरसेवकांनी त्या निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी अनेकदा केली. तरीदेखील सरकारने त्यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची चौकशी का केली नाही ?''
जानेवारी महिन्यात मकरंद निकम यांनी निवृत्ती घेतली. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांनी बनावट शासकीय कागदपत्रांच्या आधारे कामे केली आहेत. एका कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे व सध्या त्या कनिष्ठ अभियंत्याची नांदेड-वडाळा येथे बदली झाली आहे, असा आरोप करत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून निकम यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहिर यांनी केली.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनीही मकरंद निकम यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक अनावश्यक व मोठ्या खर्चांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संगनमत करुन निकम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला आहे, असा आरोप जगताप यांनी केला आहे.