आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण पुन्हा रणरणत्या उन्हात सुरु
May 30 2026
25
आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण पुन्हा रणरणत्या उन्हात सुरु
पुणे, ता. ३० - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज, शनिवारी (ता. ३० मे) आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शेतात रणरणत्या उन्हात आमरण उपोषण सुरु केले आहे. उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
जरांगे यांनी उपोषण सुरु करताच मराठा समाज बांधवांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जरांगे उपोषणावर ठाम असल्याने काल, शुक्रवारी (ता. 29) शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मात्र, तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. शासनाला आता चर्चेसाठी इथेच यावे लागेल, असे जरांगे यांनी सांगितले आहे.
गुरुवारी (ता. २८) मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपोषण करणार असल्याची ठाम भूमिका जाहीर केली. उपोषण स्थळी कोणीही येऊ नये, असे त्यांनी समाजबांधवांना सांगितले होते. आज, शनिवारी (ता. ३०) त्यांनी शेतात बाजेवर बसून तळपत्या उन्हात उपोषण सुरु केले आहे. त्यांचे अनेक समर्थकही आजूबाजूने त्यांच्यासोबत बसले आहेत.