मावळ तालुक्यात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारु बनवण्यांच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
मावळ तालुक्यात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारु बनवण्यांच्या अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. ३० - मावळ तालुक्यात शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीची दारु तयार करण्याचे अनेक अड्डे आढळत असून पोलिसांची त्यावर सातत्याने कारवाई सुरु आहे. काही अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे -
- हातभट्टीच्या दारुचे ३ लाख ८५ हजार रुपयांचे रसायन जप्त, शिरगाव पोलिसांची कारवाई
मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाच्या हद्दीत पवना नदीकाठी सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारु निर्मितीवर शिरगाव-परंदवडी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९) कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचे ११ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास ओझर्डे गावाजवळील पवना नदीकाठी एक महिला आरोपी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घालत असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरून पसार झाली. आरोपी महिलेला अटक केलेली नाही.
महिलेविरुद्ध शिरगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २९) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई शुभम गणेश राजगरे यांनी फिर्याद दिली.
- पवना नदीकाठी १० हजार लिटर हातभट्टीच्या दारुचे कच्चे रसायन जप्त
मावळ तालुक्यातील शिरगाव गावाच्या हद्दीत पवना नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर शिरगाव-परंदवडी पोलिसांनी कारवाई करत १० हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन जप्त केले. या रसायनाची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २९) सकाळी साडेसहाच्या सुमारास पवना नदीकाठी ही कारवाई करण्यात आली. एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिला आरोपीने जमिनीतील खड्ड्यात ताडपत्री टाकून त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरून पसार झाली. त्यामुळे आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिल सुनील पवार यांनी फिर्याद दिली आहे.
- पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवे लगत हातभट्टीच्या दारुचे १,४०,०००/- रुपयांचे कच्चे रसायन जप्त
शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या हातभट्टीच्या दारुच्या अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९) कारवाई केली.
या ठिकाणी एका महिलेने हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन १,४०,०००/- रुपये किंमतीचे भिजत घातले होते. पोलिस आल्याची चाहूल लागताच पळून गेली आहे. हे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली नाही. तिच्यावर शिरगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सागर देवीदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे.