मावळ | १० ऑक्टोबर २०२६ : दुचाकी चालवताना अचानक आडवा आलेल्या सहा ते सात वर्षांच्या मुलाला दुचाकीची धडक लागल्यानंतर तरुणाला रस्त्यावर अडवून मारहाण केल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि हातातील कड्यासारख्या वस्तूने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय प्रकाश सातपुते (वय ३५, रा. शिवे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वासुली फाटा रस्त्यावर पडवळ बिल्डिंगजवळ घडली. तसेच भांबोली येथील बालाजी हॉस्पिटल परिसरातही मारहाणीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, दत्तात्रय सातपुते हे दुचाकीवरून जात असताना सहा ते सात वर्षांचा एक मुलगा अचानक दुचाकीसमोर आला. त्याला दुचाकीची धडक लागून तो जखमी झाला. या घटनेनंतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी सातपुते यांना रस्त्यावर अडवले.
आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कड्यासारख्या वस्तूने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर, मानेवर आणि छातीवर मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीदरम्यान आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक १५०/२०२६ असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींची नावे आणि पत्ते अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.