वाकड | १० ऑक्टोबर २०२६ : वाकड परिसरात रिक्षाला धडक देऊन रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत ५३ वर्षीय रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पायाच्या घोट्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद बाबुराव ढाले (वय ५३, व्यवसाय रिक्षाचालक, रा. माऊली चौक, सारस्वत बँकेजवळ, वाकड, पुणे; मूळ रा. गव्हाण, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास वाकडमधील मिलेनियम मॉल चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ घडली.
फिर्यादीनुसार, शिवानंद ढाले हे आपल्या रिक्षातून प्रवास करत असताना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीचालकाने रिक्षाचालकाशी वाद घालत त्यांना रिक्षा थांबवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने शिवानंद ढाले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीनंतर ढाले यांनी वैद्यकीय उपचार घेतले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या पायाच्या घोट्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक MH-14-KG-8741 वरील अज्ञात चालक असून, त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ११५(२) आणि १३१ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.