news
clock

शहरातील नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा, महापौर रवी लांडगे यांच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना

 क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका सुरु, अ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा घेतला आढावा

पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करणे, कचरा संकलन, नालेसफाई तसेच रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय वाढवून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण, कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई, नालेसफाई तसेच स्वच्छतेसंबंधित आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला. शहरातील अतिक्रमण , कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई, नालेसफाई तसेच स्वच्छतेसंबंधित कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे, माजी उप महापौर  शैलजा मोरे, नगरसदस्य मंदार देशपांडे, कुशाग्र कदम, नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे,सविता आसवानी, अरुणा लंगोटे, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे तसेच आरोग्य विभागाचे उपआयुक्त प्रदीप ठेंगल,  प्रशासन अधिकारी प्रिया गोरखे, कार्यकारी अभियंता (शहरी दळणवळण) सुनील पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, योगेश आल्हाट लक्ष्मीकांत कोल्हे, महेश बरीदे, वैशाली ननवरे, दिलीप भोसले, सोहन निकम, सचिन लोणे, उमेश बाकले, अमोल धडस, ऋषिकेश सामंत, किरण फड, सहाय्यक आरोग्य अधिकारी, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे तसेच विभागांमधील समन्वय वाढवून विकासकामांना गती देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, प्रलंबित कामांची सद्यस्थिती तसेच पुढील नियोजित विकासकामांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. बैठकीदरम्यान  तसेच शहरातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन ती कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट सूचना करण्यात आल्या. विभागांमधील समन्वय वाढवून कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने राबविणे, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे आणि प्रलंबित कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही महापौर लांडगे यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories