वाकडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
Mar 09 2026
38
वाकडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी, ता. ९ - वाकड मुख्य चौक येथे वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका स्नेहा रणजीत कलाटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची त्यांनी पाहणी केली आहे. बीआरटी बस स्टॉपचे स्थलांतर आणि बीआरटी लेन काढून टाकण्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्नेहा कलाटे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.
या वाहतूक कोंडी संदर्भात नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पीएमपीएमएल प्रशासन तसेच वाकड वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. त्यानुसार, आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता अमोल पाचांगणे, पीएमपीएमएलचे फिल्ड ऑफिसर गायकवाड तसेच वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, उपपोलीस निरीक्षक नवनाथ खेडकर व पोलीस हवालदार बापू पोटे यांच्यासह नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी वाकड मेन चौक येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी बस स्टॉपची सध्याची जागा, बीआरटी लेनमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच वाहतूक कोंडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे स्नेहा कलाटे यांनी सांगितले आहे. नागरिकांना सुरळीत व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, अशी माहिती नगरसेविका स्नेहा रणजीत कलाटे यांनी दिली.