महापौर रवी लांडगे यांचा यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने होणार सन्मान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन, येत्या गुरुवारी दुपारी ४ चिंचवड येथील ऑटोक्लस्टर ऑडिटोरिअमध्ये पुरस्कार सोहळा
पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाचा वतीने 'यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ चिंचवड येथील ऑटोक्लस्टर ऑडिटोरिअमध्ये होणार आहे. शहरवासियांनाी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे असणार आहेत. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
या सोहळ्यात राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डॉ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत – वेणू पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नगरसेविका शिवानी नरळे यांना (वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार), आर. के. डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सचे संचालक राजाराम मलघे यांना (यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार) आणि ब्राईट इंडस्ट्रीजचे संचालक वसंत गायकवाड यांना (यशवंतराव चव्हाण उद्योगविभूषण पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, राजाभाऊ गोलांडे, सुरेश घुले, अनिल भोसले, शांताराम भालेकर, उमा खापरे, सुलभा उबाळे या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी, श्रमश्री बाजीराव सातपुते ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.