news
clock

निगडी येथील 'पीएमपी'चा बसथांबा भक्ती-शक्ती उद्यानासमोर हलवावा, भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरी, ता. ६ -  निगडी येथील बस थांब्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. या बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करत करतात. सध्या या बस प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे, निगडी बस थांबा भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

काळभोर यांनी प्रवाशांचा प्रश्न सविस्तरपणे प्रशासनाच्या निदर्शनास आणला आहे. निगडी बस थांबा परिसरात मोठे ट्रक, ट्रॅव्हल्स बस तसेच इतर जड वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे.  काही रिक्षाचालक बसथांब्याजवळ रस्त्यावरच गाड्या आडव्या लावून प्रवासी वाहतूक करत असल्याने बेशिस्त झाली आहे. बसथांब्याच्या आजूबाजूला टपरीधारक आणि हातगाडीधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरुन बसची वाट पाहात ताटकळावे लागत आहे. अनेकदा प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागत असून यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या मोठ्या समस्येकडे पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने लक्ष द्यावे व निगडी बसस्टॉप हा भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करावा. बसथांब्याच्या परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, रिक्षाचालक आणि ट्रॅव्हल्स बस यांना बसथांब्याजवळ प्रवासी वाहतूक करण्यास मज्जाव करावा आणि मोठ्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी घालावी. प्रशासनाने लवकर हा प्रश्न सोडवावा, असे काळभोर यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories