राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई
राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई
औषधांची गुणवत्ता किंवा अवैध साठवणुकीबाबत एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन
पुणे, ता. १ - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारुच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा ५,९२९ किलो साठा जप्त केला. प्राथमिक तपासात पुणे प्रकरणातील दारुमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे.
अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या या दारुमध्ये 'मिथेनॉल' हे विषारी रसायन मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न व औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नागरीकांनी औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ एफडीएकडे तक्रार करावी. तक्रारीमध्ये नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संबंधित औषध अथवा पदार्थाची माहिती नमूद करावी. नागरिकांच्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करुन तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, टोल-फ्री हेल्पलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.