म्हाडाचे घर खरेदी करुन देण्याचे खोटे आश्वासन देऊन ७४ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. २२ - म्हाडाचे रो हाऊसमधील घर खरेदी करुन देण्याच्या आश्वासनाला बळी पडून एका दांपत्याची तब्बल ७४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार संत तुकारामनगर परिसरात मार्च २०२४ ते २१ मे २०२६ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी पूनम रामप्रसाद शर्मा (वय ४४ वर्षे, रा. संततुकारामनगर) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी प्रदिप मारुती गोपलघरे (रा. कोथरुड), गोकुळ नामदेव माहिते (रा. आंबेगाव खुर्द), निखील अंबाजी पवार (वय ३५ वर्षे, खराळवाडी, पिंपरी) व कुलदीप सिंग मोहिंदर सिंग एधी (वय ५६ वर्षे, रा. संततुकारामनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींनी आपआपसात संगनमत करुन संत तुकारामनगर येथील १४ नंबरचा म्हाडाचे रो हाऊस हा खरेदी करुन देतो असे फिर्यादी पूनम व त्यांच्या पतीस सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी कॅश व ऑनलाईन स्वरुपात ७४,२०,०००/- रुपये त्यांच्याकडून घेतले. मात्र, त्यांना घर खरेदी करुन दिले नाही.
आरोपींवर गुरुवारी (ता. २१) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चेकलम ३१८ (४), ३१६ (२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.