मोशी दुर्घटनेतील मयत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा, प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे 55 लाखांची आर्थिक मदत निश्चित
मोशी दुर्घटनेतील मयत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा, प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे 55 लाखांची आर्थिक मदत निश्चित
पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अति आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पाठपुरावा करून मृतांच्या कुटुंबीयांना तब्बल 55 लाख रुपयांची मदत मिळवून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
शितोळे यांनी सांगितले की, ''मोशी कचरा डेपो दुर्घनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीच्या वतीने एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याशिवाय कुटुंबीयांचा वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही कंपनीने मान्य केले आहे. सध्या महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये आणि कंपनीच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये, अशी २० लाख रुपयांची मदत कुटुंबीयांना मिळाली आहे. उर्वरित २० लाख रुपयांची मदतही कंपनीच्या वतीने येत्या काही दिवसांत देण्यात येणार आहे. या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन थांबायचे नाही, तर त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील.''
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यापैकी दोन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अद्याप ही मदत मिळालेली नाही. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशांत शितोळे यांनी दिली.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी यासाठी महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेण्यात आल्या. कुटुंबीयांच्या मागण्यांवर चर्चा करून त्यांच्या सहमतीने प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीच्या वतीने मान्य करण्यात आले असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.
याशिवाय, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी तसेच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही कंपनीने मान्य केले आहे. सध्या महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये आणि कंपनीच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची मदत कुटुंबीयांना प्राप्त झाली आहे. कंपनीच्या वतीने उर्वरित २० लाख रुपयांची मदतही काही दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून देणे तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातून निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
याशिवाय, मृत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक हे आमच्यासाठीही कुटुंबीयच आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात त्यांच्या ज्या काही गरजा असतील, त्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे, कंपनीच्या वतीनेही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे,” असेही सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.
तत्पूर्वी प्रशांत शितोळे यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसमवेत तसेच महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कुटुंबीयांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून, त्यांच्या सहमतीने प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या पत्रकार परिषदेस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्ष निखील बोऱ्हाडे, नगरसदस्य सचिन तापकीर, नगरसदस्या सारिका गायकवाड, रविंद्र गायकवाड,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय,ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मदतीचे स्वरूप आणि बैठकीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत -
🔹 एकूण मदत: प्रत्येक मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ४० लाख आणि मनपाची 10 लाख तसेच शासनाचे 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
🔹 वितरण टप्पे: मयतांच्या कुटुंबीयांना यापूर्वी १० लाख रुपये देण्यात आले आहेत, तर आता झालेल्या बैठकीनंतर पुढील १० लाख रुपये जमा करण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
🔹 कायदेशीर लाभ: या विशेष मदतीसोबतच नियमानुसार मिळणारे पीएफ (PF) आणि इन्शुरन्स (Medical Insurance) चे सर्व लाभ देखील कुटुंबीयांना दिले जातील.
🔹 करार (Agreement): ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी लवकरच अधिकृत अग्रिमेंट करण्यात येणार आहे.