महानगरपालिकेच्या भोसरी येथील शाळेत पार पडला ‘शून्य कचरा पुरस्कार सोहळा’

महानगरपालिकेच्या भोसरी येथील शाळेत पार पडला ‘शून्य कचरा पुरस्कार सोहळा’

महानगरपालिकेच्या भोसरी येथील शाळेत पार पडला ‘शून्य कचरा पुरस्कार सोहळा’ 

 शून्य कचरा पर्व’ला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रारंभ, उपमहापौर शर्मिला बाबर व माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

  

पिंपरी, दि. १० ऑगस्ट २०२६ - स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक, महापौर रवी लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात ‘शून्य कचरा पर्व’ या अभिनव उपक्रमाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. आचार्य अत्रे रंगमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर आणि माजी नगरसदस्या डॉ. श्रद्धा लांडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी येथे राबविण्यात आलेल्या ‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच ‘शून्य कचरा आदर्श शाळा पुरस्कार-२०२६’ इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरीला प्रदान करण्यात आला.

इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी येथे शून्य कचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल विकसित करण्यात आले असून, शाळेत निर्माण होणाऱ्या ओला, सुका व घातक कचऱ्याचे शास्त्रीय वर्गीकरण, स्वतंत्र डस्टबिनची व्यवस्था, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण यावर विशेष भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांची ‘शून्य कचरा क्लास मॉनिटर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची नियमित नोंद ठेवणे, पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याचे मूल्यमापन करणे, दरवर्षी ‘शून्य कचरा ऑडिट’ करणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त व आकर्षक वस्तू तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, अशा विविध उपक्रमांचा या मॉडेलमध्ये समावेश आहे. ‘ही कचरा गाडी नाही, ही पुनर्वापराची गाडी आहे’ हा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत आहे.

या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि पालकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छतेचा हा पुरस्कार स्विकारताना पुरस्कारार्थी विद्यार्थी, शिक्षक आनंदून गेले होते. 

‘शून्य कचरा पर्व’ केवळ महानगरपालिकेच्या शाळांपुरते मर्यादित न ठेवता भविष्यात खासगी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच शहरातील नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी शून्य कचरा अभियान राबविणे आणि विद्यार्थ्यांकडून शून्य कचऱ्याची स्वप्रतिज्ञा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसेवक विराज लांडे, आसरा सोशल फाउंडेशनच्या अर्चना मोरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शून्य कचरा ही केवळ एक मोहीम नसून स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठीची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही चळवळ प्रत्येक घरापर्यंत आणि पुढे संपूर्ण शहरापर्यंत पोहोचवून शून्य कचऱ्याची संस्कृती रुजविण्याचा संकल्प आहे,’ असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories