तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची लूट; सोन्याचा ऐवज घेऊन लंपास

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची लूट; सोन्याचा ऐवज घेऊन लंपास

मोशी | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून एका ७७ वर्षीय वृद्धाची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी वृद्धाला पोलीस असल्याचे सांगत विश्वासात घेतले आणि त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मोशीतील श्री श्री रविशंकर विद्यालय, बोऱ्हाडेवाडीच्या पुढे सुमारे १०० मीटर अंतरावर, निर्जन रस्त्यावर कन्स्ट्रक्शनचे निळे पत्रे असलेल्या ठिकाणाजवळ घडली.

या प्रकरणी बबन भाऊसाहेब बोऱ्हाडे (वय ७७ वर्षे, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. त्यापैकी एकाने वृद्धाला, ‘तुम्हाला आवाज दिलेला ऐकू येत नाही का? तुम्ही पाटलांना ओळखता का? आम्ही पोलीस आहोत,’ असे सांगितले. तसेच विश्वास बसावा यासाठी त्याने लांबूनच पोलिसांचे ओळखपत्र दाखवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, तेथून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीलाही आरोपीने आवाज देऊन बोलावले. त्याला अंगठी आणि चेन रुमालात काढून ठेवण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने तसे करून रुमाल स्वतःच्या खिशात ठेवला.

त्यानंतर आरोपीने वृद्धाला, ‘तुम्हाला काय वेगळे सांगायचे का?’ असे म्हणत त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चेन रुमालात काढून ठेवण्यास सांगितले.

फिर्यादीने अंगठी आणि चेन रुमालात काढून ठेवल्यानंतर आरोपीने त्या दागिन्यांवर दागिने खरेदी केल्याचा पुरावा दाखवण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्याने वृद्धाच्या हातातून दागिने असलेला रुमाल घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या रुमालात १ लाख २० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि ६० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी होती. अंगठीच्या वरच्या बाजूला बदामासारखा आकार आणि त्यावर तीन रेषा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अशाप्रकारे एकूण ३० ग्रॅम वजनाचे, १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीने ताब्यात घेतले. त्यानंतर दुचाकी सुरू करून वृद्धाच्या पाठीमागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला दुचाकीवर बसवून दोघेही घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories