रावेतमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर कोयत्याने वार; दोन जणांविरोधात गुन्हा

रावेतमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर कोयत्याने वार; दोन जणांविरोधात गुन्हा

रावेत | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात कामावर येत नसल्याच्या कारणावरून एका सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दोन जणांनी मिळून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केली. त्यापैकी एकाने लोखंडी कोयत्याने गळ्यावर वार केला, तर दुसऱ्याने हाताने आणि बेल्टने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रावेत येथील यशदा सोसायटीसमोरील शताब्दी कॉर्नर चौकात घडली.

या प्रकरणी ज्ञानेश्वर विश्वास पाटील (वय ३८ वर्षे) यांनी फिर्याद दिली असून गजानन पवार आणि परशुराम वारे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी दोघेही घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीला दोन ते तीन वेळा पगार मागितल्याच्या कारणावरून आणि फिर्यादीने कामावर येणार नसल्याचे सांगितल्याच्या रागातून दमदाटी केली.

आरोपींनी फिर्यादीला, ‘तुमच्याकडे आम्ही कामावर कसे येत नाही? तू कामावर आला नाही तर तू जगात पण राहणार नाही,’ अशा आशयाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर गजानन पवार याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.

तसेच दुसरा आरोपी परशुराम वारे याने निलेश मगन गर्दे पाटील याला  हाताने आणि बेल्टने पोटावर व पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०९, ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories