मोशी दुर्घटनेनंतर कारवाई - मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा पदभार काढला
मोशी दुर्घटनेनंतर कारवाई -
मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा पदभार काढला
पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर महापालिकेने अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा पदभार काढून घेतला आहे. आयुक्तांनी सोमवारी (ता. १३) हा आदेश जारी केला आहे. दोघांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता - १ संजय कुलकर्णी यांच्याकडे सोपविलेले पर्यावरण अभियांत्रिकी, जलनिःसारण मुख्य कार्यालय, झोनिपू स्थापत्य, BSUP (Basic Services to the Urban Poor) व PMAY (PMAY - Pradhan Mantri Awas Yojana)या विभागाचे सर्व कामकाज मुख्य अभियंता-२
२ प्रमोद ओंबासे यांच्याकडे सोपवले आहे. कार्याकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्याकडे सोपवलेले पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज कार्यकारी अभियंता (पर्यावरण) सोहन निकम यांच्याकडे सोपवले आहे.
प्रमोद ओंबासे (मुख्य अभियंता - २) व सोहन निकम (कार्यकारी अभियंता (पर्यावरण)) यांनी, आधीचे सोपविलेले कामकाज सांभाळून नव्याने सोपवलेले कामकाज करावयाचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी १३ जुलैपासून करण्यात येत आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
कारणे दाखवा नोटिस .....
मोशी कचरा डेपो येथील सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष, कर्तव्यात कसूर आणि ढिगा-याखाली दबून ९ कंत्राटी कामगाराच्या झालेल्या मृत्यूच्या गंभीर दुर्घटनेच्या अनुषंगाने सुरक्षिततेतील गंभीर निष्काळजीपणाबाबत संजय कुलकर्णी व योगेश यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला कायदेशीर व मुद्देनिहाय खुलासा मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे समक्ष सादर करायचा आहे.
आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे की, आपल्या या गंभीर निष्काळजीपणाबद्दल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२) व महाराष्ट्र नागरी सेवा
(शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये आपलेविरुद्ध कडक शिस्तभंगाची विभागीय चौकशीची कारवाई
का करण्यात येऊ नये? त्याचप्रमाणे जीवितहानीच्या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून आपणास
सेवेतून तात्काळ निलंबित (Suspend) का करण्यात येऊ नये? यांचा याबाबत खुलासा व उक्त बाबींचा
सविस्तर व समर्थनीय खुलासा नमुद मुदतीत सादर करावा.दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास,
अथवा केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास तुमचेविरुध्द नोटीसीत नमुद केल्याप्रमाणे कारवाई
करण्यात येईल याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.