शहरातील रस्ते दुरुस्तीचे आठवडभरात काम सुरु करावे, अन्यथा आंदोलन करु
राष्ट्रवादी कॉंग्रेस वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांचे आयुक्त व महापौरांना निवेदन
पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - शहरात सर्वत्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रासले आहेत. महापालिका प्रशासन रस्त्यांची दुरुस्ते करते परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे झालेली असते. या प्रश्नाकडे आयुक्तांनी व महापौरांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. येत्या आठवडभरात रस्ते दुरुस्तीचे काम सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. याबाबत, त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. रस्ते दुरुस्तीचे काम सुरु केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा वरखडे यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवरील खड्डे दरवर्षी बुजवले जातात मात्र, परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. सध्या रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. देहू आळंदी रस्ता, चिंचवड स्टेशन, तळवडे, मोशी चऱ्होली रस्ता, बोऱ्हाडेवाडी, चिंचवड स्टेशन ते चिखली येथील रस्त्यांची पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. निगडी ते चिंचवड मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे आधीच रस्ते अरुंद झालेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनाही पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने अतिशय सावकाश चालवावी लागतात, त्यामुळे एसटी, बस या सारखी वाहने वेळेवर थांब्यावर पोहोचत नाही, याचा त्रास वाहन धारकांना व प्रवाशांना तसेच शहरातील नागरिकांना होतो.
दरवेळी खड्ड्यांत मुरूम भरला जातो आणि पाऊस आला की वाहून जातो, पुन्हा खड्डा तसाच राहतो, या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहे. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचून राहते. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही व येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांमुळे पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना चालताना मोठी समस्या निर्माण होते. यामुळे अपघात वाढत आहे. डांबरी रस्त्यामुळे जसे पाणी मुरते तसे पाणी सिमेंटच्या रस्त्यावर मुरत नाही, त्यामुळे पाऊस गेला तरी नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यावर पाणी साचल्याने नाहक त्रास सहन करावा लागतोय.
रस्त्यांच्या या प्रश्नांवर यावर महापालिका आयुक्त, महापौरांनी तातडीने लक्ष घालावे. पुढील आठवडाभरात रस्त्ये दुरुस्तीचे काम सुरु केले नाही तर राष्ट्रवादी वाहतूक संघटना आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे, असे विनोद वरखडे यांनी सांगितले आहे. निवेदन देताना पदविधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी, सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ वाळके, अनुराग कुरणे पाटील, अकबर शेख, स्वप्निल चौव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.