जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा फडवला तिरंगा, पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेची तिसरी एवरेस्ट मोहिम यशस्वी

जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा फडवला तिरंगा, पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेची तिसरी एवरेस्ट मोहिम यशस्वी

जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा फडवला तिरंगा, पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेची तिसरी एवरेस्ट मोहिम यशस्वी

पुणे, ता. २१ - गिरिप्रेमीच्या संस्थेच्या गिर्यारोहकांनी नुकतीच एव्हरेस्ट मोहिम यशस्वी केली आहे. तब्बल ८ हजार ८४८.८६ मीटर उंचीच्या जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर २१ मे रोजी पहाटे गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही चढाई पूर्ण करण्यात आली. सन २०१२  व सन  २०१३ नंतर गिरिप्रेमीची ही तिसरी यशस्वी एव्हरेस्ट मोहीम ठरली आहे.

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत विवेक शिवदे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर यांनी यशस्वी शिखर चढाई केली. त्यांच्यासोबत लाक्पा शेर्पा, उर्गेन शेर्पा आणि लाक्पा तेनजी शेर्पा हे शेर्पा गिर्यारोहकही मोहिमेचा महत्त्वाचा भाग होते.

२ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातून रवाना झालेल्या या पथकाने जवळपास आठ आठवडे एव्हरेस्ट परिसरात राहून नियोजनबद्ध वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये लोबुचे ईस्ट शिखर चढाई तसेच एव्हरेस्टवरील कॅम्प २ पर्यंतच्या फेऱ्यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एवरेस्ट मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 


रविवारी (ता. १७) अंतिम शिखर चढाई मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर पथकाने उच्च कॅम्पमार्गे शिखराकडे आगेकूच केली. यंदा हवामान अनुकूल असले तरी गिर्यारोहकांना 'डेथ झोन'मध्ये - म्हणजे ८००० मीटरवरील अत्यंत कमी प्राणवायू असलेल्या क्षेत्रात - सलग १० तासांहून अधिक काळ चढाई करावी लागली. आरोग्याशी संबंधित कारणांमुळे संघातील सदस्य निकुंज शहा यांनी कॅम्प ४ च्या खालील भागातून परतण्याचा कठीण पण योग्य निर्णय घेतला. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरुन मोहिमेचे समन्वयन करणारे मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे म्हणाले, “यंदा एव्हरेस्टवरील हवामानाची संधी नेहमीपेक्षा खूपच कमी होती. जेट स्ट्रीम्स सतत सक्रिय असल्याने शिखर चढाईसाठी उपलब्ध वेळ अत्यंत मर्यादित होता. अशा परिस्थितीत योग्य वेळ साधत सुरक्षितरीत्या शिखर चढाई पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते, जे संघाने यशस्वीपणे पार केले. हवामानाची साथ मिळाली, पण या यशामागे संघाची शिस्त, संयम, मानसिक ताकद आणि टीमवर्क अधिक महत्त्वाचे ठरले.”

या यशस्वी मोहिमेसह उमेश झिरपे यांनी आता एकूण १८ गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखरावर नेण्याचा मान मिळवला आहे. ही मोहीम भारत सरकारच्या फिट इंडिया अभियानाला पाठिंबा देणारी असून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणारी ठरली. तसेच जबाबदार गिर्यारोहण, हिमनद्या संवर्धन आणि हवामान बदलाबाबत जनजागृती हाही मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश होता.

या मोहिमेच्या यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये नेपाळस्थित पीक प्रमोशन एजन्सीचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. मोहिमेसाठी आवश्यक समन्वय आणि लॉजिस्टिक सहाय्य त्यांनी प्रभावीपणे पुरवले. मोहिमेला पूर्णार्थ, नमः, एनप्रो, ऍटमबर्ग, मायक्रो इनोटेक इंडिया, स्मार्टमार्क, एशियन मशीन टूल्स कॉर्पोरेशन प्रा. लि., गोक्यो तसेच इतर अनेक संस्थांचे सहकार्य लाभले. गिरिप्रेमीने सर्व हितचिंतक, कुटुंबीय, समर्थक आणि प्रायोजकांचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories