रावेत गोळीबार प्रकरणातील ३ संशयीत शूटर्सना उत्तराखंडमधून अटक
पिंपरी, ता. २१ - रावेत परिसरात काल, शुक्रवारी (ता. १५) रात्री ९.२४ च्या सुमारास रावेतमधील ए. जे. फर्निचर मॉलवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्नोई याच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या घटनेतील बिश्नोई गँगशी संबंधित तीन संशयीत शूटर्सना पोलिसांनी उत्तराखंड येथून ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये प्रवीण राम निवासे (वय २३, हरियाणा), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, हरियाणा) आणि सागर अजय पाल (वय २१, हरियाणा) यांचा समावेश आहे. वेगाने तपास करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचा बिश्नोई गॅंगशी असलेल्या संबंधांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.