पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ४ धोकादायक गुन्हेगार स्थानबद्ध
पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये ४ सराईत धोकादायक गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंध अधिनियम (एम.पी.डी.ए.) कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.
सन २०२५ मध्ये एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेच्या एकूण ३५ कारवाया करण्यात आल्या होत्या. यंदाही, शहरात दहशत माजवणारे गुन्हे करणारे, खून, खूनाचा प्रयत्न, खून करण्यासाठी अपहरण करणे, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, दुखापत करणे, दरोडयाचा प्रयत्न, खंडणी करीता अपहरण करणे, धाकदपटशा, विना परवाना दारु विक्री करणे, बेकायदेशिररित्या जुगार चालविणे, अग्निशस्त्रे व धारदार हत्यार जवळ बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशन स्तरावर ही कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
यामध्ये शहरातील ४ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात १ वर्ष कालावधीसाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेले आहेत. या गुन्हेगारांमध्ये १) रामदास मारुती साळुंके (वय-३७ वर्षे, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबद्ध केले आहे. २) अर्जुन बिरबल राठोड (वय-४१ वर्षे, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) यास हरसुल मध्यवर्ती कारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध केले आहे. ३) शरद ज्ञानेश्वर मोरे (वय-२७ वर्षे रा. रिहे, मोरेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यास कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे स्थानबद्ध करण्यात करण्यात आले आहे आणि ४) रजीत लक्ष्मण येरकर (वय-१९ वर्षे रा. शहा पेट्रोल पंपाचे मागे, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे ......
१) उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व उत्तर महाळुंगे, चाकण, खेड, शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा पोहचविणारा अट्टल गुन्हेगार रामदास मारुती साळुंके, वय ३७ वर्षे, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे, हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह खून, खुन करण्यासाठी अपहरण करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी, दुखापत, घातक हत्यारे जवळ बाळगणे इ. सारखे ८ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला होता.
२) चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व चाकण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा पोहचविणारा, गावठी हातभट्टीची दारु विक्री करणारा अट्टल गुन्हेगार अर्जुन बिरबल राठोड, वय-४१ वर्षे, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे, हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह गावठी हातभट्टी दारुची विक्री करणे या सारखे ५ गुन्हे केलेले आहेत. स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला होता.
३) उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व उत्तर महाळुंगे, चाकण, हिंजवडी, पौड पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा पोहचविणार सराईत गुन्हेगार शरद ज्ञानेश्वर मोरे, वय-२७ वर्षे रा. रिहे, मोरेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे, हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह खुन, जबरी चोरी, दरोडयाचा प्रयत्न, खुन करण्यासाठी अपहरण, दुखापत, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे इ. सारखे ५ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन येथुन प्राप्त झाला होता.
४) चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व महाळुंगे एमआयडीस, चाकण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा पोहचविणारा सराईत गुन्हेगार रजीत लक्ष्मण येरकर, वय-१९ वर्षे रा. शहा पेट्रोल पंपाचे मागे, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी करीता अपहरण करणे, धाकदपटशा, धारदार हत्यारे जवळ बाळगणे असे ३ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथुन प्राप्त झाला होता.