'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' नोंदणीला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, नोंदणी १ लाखांच्या घरात
पुणे, ता. ४ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' उपक्रमाद्वारे डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक म्हणाले, आठवडाभरातच एकूण १ लाख २१ प्रवाशांनी नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 'महिला सन्मान योजना' लाभार्थ्यांचा सहभाग सर्वांत जास्त आहे. एकूण, ३७ हजार ९२७ महिलांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेमध्ये ३४ हजार ९४८ ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. एसटी महामंडळाचा हा उपक्रम प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
१ मार्चपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असल्याशिवाय सवलत धारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा पसरली होती. जोवर, ८० टक्के सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.