वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक
वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक
पुणे, ता. २१ - वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना गुरुवारी (ता. २१) वाघोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व अंतरिम जामीन संरक्षणासाठी त्यांनी मुदतवाढीचा अर्ज दाखल केला होता. तो पुणे न्यायालयाने फेटाळला.
वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्याविरोधात नलिनी आशिष वायाळ (वय ४१, रा. येरवडा) यांनी तक्रार दिली होती. लवांडे यांच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात लवांडे यांना येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. ९ मे रोजी त्यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करण्यात आली होती. अटकेनंतर लवांडे यांनी सोशल मडियावर पोस्ट लिहून ''पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..'' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या पोस्टमध्ये लवांडे यांनी म्हटले आहे की, '' माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.''