'NEET' परीक्षेत वाकडमधील अतुल्या डोंगरे हिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पटकावला ४९८ वा क्रमांक

'NEET' परीक्षेत वाकडमधील अतुल्या डोंगरे हिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पटकावला ४९८ वा क्रमांक

 'NEET'परीक्षेत वाकडमधील अतुल्या डोंगरे हिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पटकावला ४९८ वा क्रमांक 

पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - वाकडमधील रहिवासी अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET-UG 2026)७२० पैकी ६७० गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR)४९८ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केल्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी शिस्तबद्ध पद्धतीने केली.

आपल्या यशाबाबत मनोगत व्यक्त करताना अतुल्या म्हणाली, "नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी मी कायम जोपासल्या. अभ्यासातील शंका तत्काळ शिक्षकांकडून दूर करून घेतल्या. जीवशास्त्रासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला, तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी भरपूर प्रश्नांचा सराव केला. परीक्षेच्या काळात तणाव होता; मात्र पालक आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास कायम राहिला. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पुढे आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे. त्यानंतर आपल्या देशातच राहून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे."

अतुल्याचे वडील बाळासाहेब व आई शर्मिला म्हणाले, "डॉक्टर होण्याचा निर्धार तिने बालपणापासून केला होता. त्या दिशेने तिने सातत्याने मेहनत घेतली. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिलो. तिच्या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. अतुल्या लहानपणापासून अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती आहे. एखादे उद्दिष्ट निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नाही. तिच्या मेहनतीचे आज सार्थक झाले असून तिच्या यशाचा आम्हाला खूप आनंद आहे."



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories