क्राईम रिपोर्ट - पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीविषयक बातम्या - १७ जुलै २०२६

क्राईम रिपोर्ट -   पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीविषयक बातम्या - १७ जुलै २०२६

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 क्राईम रिपोर्ट - 

पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीविषयक बातम्या - १७ जुलै २०२६ 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ पिंपळे सौदागरमध्ये केअरटेकरकडून २ लाख २२ हजारांचा ऐवज लंपास; आरोपी अटक

पिंपळे सौदागर येथील एका घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणानेच घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

याबाबत संबंधित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मार्च २०२६ पासून १९ जून २०२६ या कालावधीत डॅफोडाईल्स हौसिंग सोसायटी, ए-१ इमारत, फ्लॅट क्रमांक ३०३, पिंपळे सौदागर येथे घडली. 

आरोपी पारस यादव (वय ३०, रा. रहाटणी) हा फिर्यादीच्या घरी केअरटेकर म्हणून काम करत होता. त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या संमतीशिवाय सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लंपास केला. आरोपीविरोधात गुरुवारी (ता. १६) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ देहूगावात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, चालकाला अटक

देहूरोड-देहूगाव मार्गावरील परंडवाल चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

 फिर्यादी मनोहर शाम विधाटे (रा. देहूगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ओम मनोहर विधाटे (वय २०) आणि त्याचा मित्र प्रेम महेश शेवाळे (वय २०, रा. अभंगनगरी, देहूगाव) हे अॅक्टिव्हा  दुचाकीवरून देहूरोडहून देहूगावकडे जात होते. परंडवाल चौकात ते थांबले असताना मागून आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रेम शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओम विधाटे गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी ट्रकचालक बाळू विश्वनाथ बखळे (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (ए), १२५ (बी), २८१, सह मोटार वाहन कायदा अधिनियम १९८८ चे कलम ११९/१७७,१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ रावेतमध्ये भिंतीवर ठेवलेला मोबाईल चोरीला, एकाला अटक

रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत उदय हिल्स सोसायटीसमोरील परिसरातून भिंतीवर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. १६) रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान उदय हिल्स सोसायटीसमोरील लाईटच्या खांबाशेजारील भिंतीवर ठेवलेला विक्रम दत्तु वंगवाड (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांचा सुमारे १३ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला. तपासादरम्यान पोलिसांनी बेचन कुमार पलट कुमार मंडल (वय २४, रा. सूसगाव, मूळ रा. बिहार) याला अटक केली आहे. आरोपीविरोधात रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ कुसगावात फ्लॅश जुगारावर पोलिसांचा छापा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

 मावळ तालुक्यातील कुसगाव गावठाण परिसरातील एकता मित्र मंडळाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या फ्लॅश जुगारावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाचे पोलिस शिपाई संदीप प्रकाश गंगावणे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी रात्री सुमारे ९.४० वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांवर पैसे लावून फ्लॅश हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते व रोख रक्कम असा एकूण ३,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आकाश दत्तात्रय केदारी (वय २९), माधव रामभाऊ केदारी (वय ५०), अतुल प्रताप जाधव (वय ३९), आकाश अंकुश केदारी (वय ३३), दत्तात्रय दामु केदारी (वय ४५), गणेश बबन कावडे (वय ३६), महेश अंकुश केदारी (वय २९), केतन विजय तनपुरे (वय ३२) आणि सोमनाथ अंकुश केदारी (वय ४२) (सर्व रा. कुसगाव, ता. मावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ नांदे-मुळशी येथे कोयता बाळगणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

 पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका युवकाविरुद्ध बावधन पोलिसांनी आर्म अॅक्टसह महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. युवकाला नोटिस बजावली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार अरुण पांडुरंग नरळे यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १६ जुलै) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नांदे (ता. मुळशी) येथील सुस-नांदे रोडवरील सनीज एच फुड्स समोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्वराज सुरेश ढमाले (वय २४, रा. ढमाले वस्ती, नांदे, पुणे) याच्या ताब्यातून सुमारे ५०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी ८ जुलै ते २१ जुलै २०२६ या कालावधीत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे व प्राणघातक हत्यारे बाळगण्यास मनाई आदेश लागू केलेले असतानाही आरोपीने त्याचा भंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपीविरोधात बावधन पोलिस ठाण्यातआर्म अॅक्ट कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम ३५ (३) प्रमाणे नोटिस बजावली आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ खेड तालुक्यातील साबळेवाडीत गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल 

 खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध चाकण दक्षिण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मौजे साबळेवाडी (ता. खेड) येथे एका पत्र्याच्या घराच्या पडवीत संबंधित महिला प्लास्टिकच्या पिशवीतून गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता काळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये गावठी दारू आढळून आली. तसेच घरातील प्लास्टिकच्या गोणीत ठेवलेल्या पिशव्यांमध्ये गावठी दारूचे ३३ फुगे मिळून आले.

या कारवाईत एकूण २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ ऑनलाइन टास्कच्या आमिषाने मोशीतील तरुणाची ८ लाखांची फसवणूक

ऑनलाइन रेटिंग व रिव्ह्यू देण्याच्या कामाचे आमिष दाखवून ३० टक्के परतावा देण्याचे सांगत मोशी येथील एका तरुणाची ८ लाख ७ हजार ६८३ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत,  सुनिल सोपान पोखरकर (वय ३८, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. फिर्यादी सुनिल पोखरकर यांना एका ऑनलाइन लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले.

आरोपीने विविध ठिकाणांच्या रेटिंग व रिव्ह्यूचे काम देऊन त्यावर ३० टक्के परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर वेगवेगळे ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे वेळोवेळी ८,०७,६८३ रुपये घेतले. मात्र, रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणूक करणाऱ्या महिला आरोपीविरोधात गुरुवारी (ता. १६) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories