दिघी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथील NSS Unit A-106 च्या स्वयंसेवकांनी दिघी येथील ज्ञानदीप बालगृहात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला. या उपक्रमात NSS Unit A-106 चे ५८ स्वयंसेवक सहभागी झाले. बालगृहातील मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रार्थनेने झाली. स्वयंसेवकांनी बालगृहातील मुलांच्या हातावर राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवकांनी अभंग, समूहगायन, नृत्य आणि पथनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. बालगृहातील मुलांनीही या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकी जपत NSS स्वयंसेवकांकडून बालगृहातील मुलांना वह्या, पेन, रंग आणि डिजिटल स्लेट यांसारखे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. तसेच बालगृहासाठी ५ ट्यूबलाईट्सचे योगदान देण्यात आले. या उपक्रमातून मुलांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्यासोबतच त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवक आणि बालगृहातील मुलांमध्ये स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या या आपुलकीच्या नात्यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. प्रेम, बंधुभाव, करुणा, एकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हा उपक्रम कॅम्पस डायरेक्टर RAdm अमित विक्रम, प्राचार्या डॉ. (श्रीमती) पी. मालथी आणि NSS मेंटर व डीन ॲडमिनिस्ट्रेशन डॉ. संदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
यावेळी डीन ऑफ स्टुडंट अफेयर्स डॉ. (श्रीमती) स्मिता व्ही. पाटसकर, NSS प्रोग्राम ऑफिसर श्री. महेश व्ही. ताटीकोंडा, NSS को-प्रोग्राम ऑफिसर श्रीमती उत्कर्षा खराडे आणि NSS IT विभाग समन्वयक कु. मृणाली बोंग यांच्यासह NSS स्वयंसेवक उपस्थित होते.
बालगृहातील मुलांसोबत साजरा केलेला हा रक्षाबंधन सोहळा स्वयंसेवकांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.