बोपखेल | ३१ ऑगस्ट २०२६ : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बोपखेल येथील गणेशनगर परिसरात घडली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुर्गामाता मंदिर, गणेशनगर, बोपखेल येथे हा प्रकार घडला. फिर्यादी तुषार प्रकाश डोंगरे वय २३ रा. बोपखेल यांच्यावर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्रे आणि लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यात, हातावर व पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी दिपचंद यादव वय २५ रा. बोपखेल याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, अनुज धोंगडे वय २०, पियुष रोकडे वय २५ आणि मयंक ऊर्फ मडडू यांच्यासह एक-दोन अनोळखी इसमांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी घटनास्थळी येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.