ऑनलाईन गुंतवणूकीत महिलेची १५ लाख ९१ हजारांची फसवणूक
पिंपरी, ता. ३ - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून एका महिलेची १५ लाख ९१ हजार ५०/- रुपयांची फसवणूक झाली आहे.
याबाबत, गुुरुवारी (ता. २) निगडी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलेने किर्ताना बंगेरा या महिलाविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा भारतीय दंड संहिता २०२३, कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, कलम ६६ डी अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २२ सप्टेंबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान, फ्लॅट नं. ७०१, ए विंग, ७ वा मजला, प्रशांत रेसिडन्सी, चिंचवड स्टेशन, पुणे येथे फिर्यादीला फेसबुकवर शेअर मार्केटशी संबंधित एक लिंक प्राप्त झाली. लिंक उघडल्यानंतर, किरतना बंगेरा या महिलेनं त्यांना “सॅमको एफर्टलेस ट्रेडिंग” व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड केले.
त्यानंतर, फिर्यादीला कंपनीत रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन शेअर्स खरेदी व विक्रीसाठी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. मात्र, गुंतवलेली रक्कम किंवा त्याचा परतावा मिळालेला नाही. यात फिर्यादीची एकूण १५ लाख ९१ हजार ५०/- रुपयांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा तपास सुरु आहे.