पुण्यात अनधिकृत ओव्हरहेड ऑप्टिकल फायबर केबल्स काढण्याची मोहिम कार्यान्वित
पुणे, ता. २ - पुण्यातील अनधिकृत ओव्हरहेड ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तोडण्यास पुणे महापालिकेने बुधवारी (ता. १) सुरुवात केली आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई हाती घेतली आहे. पोलिस बंदोबस्तात व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सातारा रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन ट्रक केबल काढण्यात आल्या.
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर अनधिकृत केबलचे जाळे काढून त्यावर नियंत्रण आणण्याचे तसेच त्याद्वारे महसुल गोळा करण्यासही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. ओव्हरहेड ऑप्टिकल फायबर केबलमुळे पघाताच्या घटना घडायच्या व महसुल देखील बुडत होता. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेदहापासून कारवाईस सुरुवात झाली. सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसर, पुष्प मंगल कार्यालय, उत्सव इमारत परिसर, राजर्षी शाहू महाराज सोसायटी, पुण्याईनगर, धनकवडी या परिसरात कारवाई करण्यात आली. विद्युत व अतिक्रमण विभागाकडील वायरमन, बिगारी, तीन हायड्रॉलिक क्रेन यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. नामांकित मोबाईल कंपन्या, इंटरनेट, दूरचित्रवाणी अशा विविध प्रकारच्या केबलवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर त्या परिसरातील नामांकित कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क नाहीसे झाले.
अनधिकृत केबल काढण्याची कारवाई सुरु
शहरात अनधिकृत केबल काढण्याची कारवाई सुरु आहे. मात्र, त्यासाठी ठोस धोरण आणावे लागेल, पुढील बैठकीमध्ये हे धोरण ठेवले जाईल.
- नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका