उबर-ओला-रॅपीडो या कंपन्यांनी शासनाने ठरवलेले दर अॅपवर दर्शवावेत
महाराष्ट्र कामगार सभेची पत्रकार परिषदेत मागणी, ओन्ली मीटर मोहिम सुरु करण्याचा इशारा
पुणे, ता. १४ - प्रवाशांना वाहतूक सेवा देणाऱ्या उबर, ओला, रॅपीडो अशा कंपन्यांना राज्याच्या परिवहन विभागाने अशा कंपन्यांना शासकीय दर अॅपवर दर्शवावेत, अशी सूचना केली. मात्र, कंपन्यांनी या आदेशाला जुमानले नाही. या कंपन्यांच्या नियमोल्लंघनांमुळे प्रवासी-चालक यांच्यात वाद होताहेत. त्यामुळे या कंपन्यांनी विषयाची शासनाच्या सूचनेची दखल घ्यावी अन्यथा 'ओन्ली मीटर' ही मोहीम सुरु केली जाणार आहे, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी बुधवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. क्षीरसागर यांनी या विषयाची सविस्तर माहिती दिली. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा व टॅक्सीसाठी १ जानेवारी २०२४ पासून जे दर निश्चित केले आहेत, त्यात वातानुकूलित टॅक्सीसाठी ३७ रुपये प्रति किमी आणि नॉन-एसी टॅक्सीसाठी २५ रुपये प्रति किमीचा दर आहे. रिक्षा व कॅबचालक याप्रमाणेच दरांची अंमलबजावणी करतात. मात्र, वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या अॅपवर वेगळे दर दर्शवितात. परिणामी प्रवाशांची दिशाभूल होते. त्यामुळे चालक व प्रवाशांच्यात वाद होऊन हाणामारीचे प्रसंग घडत आहेत आणि याला कंपन्याच जबाबदार आहेत, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.
प्रवाशांना वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी शासनाने ठरवून दिलेले दर अॅपवर दाखवावेत. वादाचे प्रसंग टाळण्यासाठी ओन्ली मीटर.. ही मोहिम लवकरच सुरु केली जाईल. त्यानुसार शासनाने ठरवलेले दरच मीटरमध्ये दिसतील व ते दरच प्रवाशांनी द्यावे, डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.