महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली परंदवाडी गावात रस्ते सुरक्षा जनजागृती
Mar 12 2026
35
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली परंदवाडी गावात रस्ते सुरक्षा जनजागृती
पिंपरी, ता. १२ - राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील परंदवाडी गावात रस्ते सुरक्षा जनजागृती व रस्ता दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमांतर्गत परंदवडी कॉर्नर ते कॉलेज गेट या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. तसेच परंदवडी गावात रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध फलक व घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. यावेळी हेल्मेट परिधान करणाऱ्या वाहनचालकांना चॉकलेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. इतर वाहनचालकांनाही हेल्मेटचा वापर करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात एनएसएस स्वयंसेवक, पर्यावरण अध्ययन विषयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.