आंतराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेत नियुक्ती द्यावी, भाजप क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी
Mar 30 2026
63
आंतराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेत नियुक्ती द्यावी, भाजप क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांची मागणी
पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये थेट विविध पदांवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड क्रिडा विभागाचे शहराध्यक्ष अरुळ पाडुळे यांनी महापालिका क्रिडा समितीचे सभापती कैलास कुटे यांच्याकडे केली आहे.
याबाबत, पाडुळे यांनी कैलास कुटे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खेळाडू अत्यंत कठीण परिस्थितीत, मर्यादित साधनसामग्रीत आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करत आहेत.
हे खेळाडू फक्त पदक जिंकत नाहीत, तर आपल्या शहराचा अभिमान वाढवत असतात. त्यांना सुविधा आणि आर्थिक आधार व योग्य संधी मिळाल्यास त्यांची कामगिरी आणखी उंचावू शकते. त्यामुळे शहरातील गुणवंत खेळाडूंसाठी अत्याधुनिक क्रिडा साहित्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करुन द्यावे.
आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये थेट नोकरी द्यावी तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना स्कॉलरशिप योजना लागू करावी. आज खेळाडूंना आधार देणे म्हणजे उद्याच्या भारताला बळकट करणे होय, असे पाडुळे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना नगरसेवक कुंदन गायकवाड, योगेश लांडगे, उदय गायकवाड, श्याम जगताप उपस्थित होते.