विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघड; तिघे अटकेत, ५.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघड; तिघे अटकेत, ५.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड | १५ ऑक्टोबर २०२६ : विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीविरोधात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने मोठी कारवाई केली आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना हवा असलेल्या आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली असून, आळंदी पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत ५ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी, मरकळ, पिंपळगाव आणि परिसरात विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे मरकळ-पिंपळगाव परिसरात शोधमोहीम राबवून दुचाकीवरून फिरणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सभाजित मुरलीधर गौतम जैस्वार (वय ४५), विनोद हरिराम जैस्वार (वय ४०) आणि मनीष महेंद्र प्रसाद (वय ३८) अशी आहेत. तिघेही उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जुल्फकार खान (रा. मांजरवाडी, उंड्री) याच्या मदतीने मरकळ, पिंपळगाव आणि सोळू परिसरात विद्युत डीपी चोरी केल्याची माहिती समोर आली. जुल्फकार खान हा या प्रकरणात पाहिजे आरोपी असून, त्याचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून चोरी केलेल्या तांब्याच्या तारांचे गट्टे, गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारे आणि दुचाकी असा एकूण ५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, उघडकीस आलेल्या सहा गुन्ह्यांतील चोरीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३७०/२०२६, ४६३/२०२६, ३८८/२०२६, ३२१/२०२५, ५३१/२०२५ आणि १५७/२०२५ या सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी यांच्यासह गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories