पिंपरी | १५ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत. तसेच करवसुलीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात करसंकलन व कर आकारणी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मालमत्ता कराची थकबाकी, मालमत्ता जप्ती, मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे, सारथी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी आणि मागील बैठकीतील सूचनांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कराचा मोठा वाटा आहे. या निधीतून शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधांचे नियोजन केले जाते. त्यामुळे सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी करवसुली मोहीम राबवावी. करवसुली वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची लेखी माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
थकीत कराची वसुली लवकर होऊ शकणाऱ्या मालमत्तांना प्राधान्य द्यावे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर भरला जात नसल्यास नोटीस बजावून नियमानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय नवीन मालमत्ता सर्वेक्षणातील कर आकारणीची प्रलंबित कामे पूर्ण करणे, निवासी व व्यावसायिक मालमत्तांची माहिती अद्ययावत ठेवणे आणि सारथी पोर्टलवरील तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मागील पाच वर्षांतील करवसुलीच्या आकडेवारीशी चालू वर्षातील वसुलीची तुलना करण्यात येणार आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी करवसुलीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांच्या कामकाजातील प्रगती तपासली जाणार आहे.
या बैठकीला उपआयुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे यांच्यासह सहाय्यक मंडल अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.