क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १० ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट  - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १० ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १० ऑगस्ट २०२६ 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 भाजीविक्रेत्याकडे पाच हजारांच्या हप्त्याची मागणी; मारहाण

 भाजीविक्रेत्याकडे दरमहा पाच हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करून नकार दिल्याने दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. ८) रात्री आळंदीतील वडगाव रोड परिसरात घडली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ भिमराव डबडे (वय ६०, रा. ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ, वडगाव रोड, आळंदी) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास हरिओम गणेश पांचाळ (रा. वडगाव रोड, आळंदी) आणि त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती डबडे यांच्या भाजीपाल्याच्या गाड्यावर आले.

दोघांनी डबडे यांच्याकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जवळ पडलेल्या दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. यानंतर दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी डबडे यांनी रविवारी (९ ऑगस्ट) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हरिओम पांचाळ आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 आळंदीत ऑनलाइन ग्रुपच्या माध्यमातून चौघांची फसवणूक; ५० हजार रुपयांचा अपहार

स्वतःच्या नावावर असलेल्या बॅंक खात्याचा फसवणूकीसाठी वापर केल्याने आळंदी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  संबंधित तरुणाने ऑनलाइन ग्रुपच्या माध्यमातून साथीदारांशी संगनमत करून भारतातील चार नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणात एकूण ५० हजार ५० रुपये रक्कमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी अविनाश तुकाराम सोळंके, पोलीस शिपाई, आळंदी पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण बाबासाहेब पाळवदे (वय २३, व्यवसाय : ब्लँकेट डिलिव्हरी बॉय, सध्या रा. काळे कॉलनी क्रमांक १, देहू फाटा, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आळंदी येथील बॅंकेतील खात्यावर हा प्रकार घडल्याचे नमूद आहे. आरोपीने कथितरित्या ऑनलाइन ग्रुप तयार करून साथीदारांशी संगणमत केले. या ग्रुपचा सदस्य असल्याचे भासवून स्वतःच्या नावावरील खात्यावर चार नागरिकांकडून एकूण ५०,०५० रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 मोशीतील अपघातात दुचाकीस्वार जखमी; टेम्पोचालकावर गुन्हा

मोशी येथील स्पाईन रोडवरील संतनगर चौकात रविवारी (ता. ८) सकाळी टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग नामदेव डिगोळे (वय ३७, रा. करंदी गॅस फाटा, शिक्रापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ओमकार संजीवनराव कोंगळे (वय २८, रा. तिरुपती कॉलनी, सद्गुरूनगर, भोसरी) हे मित्राच्या बुलेटवरून निघोजेकडे जात होते. ते स्पाईन रोडच्या सर्व्हिस लेनने संतनगर चौकात आले असता स्पाईन रोडवरून आलेल्या टेम्पोने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून डावीकडे वळण घेतले. त्यावेळी टेम्पोची डाव्या बाजूने बुलेटला धडक बसली.

या अपघातात कोंगळे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच बुलेटचे नुकसान झाले. याप्रकरणी कोंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ तसेच भादंवि कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 बनावट चावीने दुकानाचे शटर उघडून २८ हजारांचे शर्ट लंपास

दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बनावट चावीच्या साहाय्याने दुकानाचे कुलूप उघडून शटर उघडले आणि दुकानातील २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता. ९) सकाळी साडेसातच्या सुमारास पिंपरीतील कपडा बाजारात घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास बी-१९/०५, कपडा बाजार, पिंपरी येथील ‘प्रगती ड्रेसेस एन एक्स’ या दुकानात घडली. दुकानाचे मालक आकाश राजेश जवराणे (वय ३३, रा. वैभवनगर फेज-२, एक्स विंग, पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा राजेश नंदलाल लुंडवानी (वय ४७, रा. गणेश फ्लोअर मिलजवळ, बौद्धनगर, पिंपरी) याने जवळील बनावट चावीने दुकानाचे कुलूप उघडले. त्यानंतर शटर उघडून दुकानात प्रवेश केला आणि तेथील २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेले. या प्रकरणी आरोपीविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री १०.५० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 रावेतमध्ये उद्यानासमोरून दुचाकी चोरी

 जिजाऊ माता गार्डन परिसरात पार्क केलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. ८) घडली. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश संजय शेलार (वय ३६, रा. मोशी) हे ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी सिटी वन इमारतीशेजारील जिजाऊ माता गार्डन येथे गेले होते. त्यांनी गार्डनसमोर त्यांचे सासरे दिलीप शंकर गाडे यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच १४ सीक्यू ४५५०) लॉक करून पार्क केली होती.

सायंकाळी पावणेआठच्या सुमारास परत आल्यानंतर दुचाकी तेथे आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेलार यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴  चिंचवडमध्ये ७३ हजारांचा गांजा जप्त; तरुणाला अटक

 चिंचवड परिसरातील वेताळनगर येथे अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी (ता. ८) कारवाई करून एका १९ वर्षीय युवकाकडून ७३ हजार ४०० रुपये किमतीचा १ किलो ४५४ ग्रॅम गांजा जप्त केला. युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोरया हाउसिंग सोसायटीच्या गेटसमोर, बिजलीनगर रोड, वेताळनगर येथे सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अटक युवकाचे नाव यश सचिन गवळी (वय १९, रा. वेताळनगर, चिंचवड) असे आहे. त्याच्याकडे गांजा, वजनकाटा, रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि काळ्या रंगाची बॅग आढळून आली.

गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे. चौकशीदरम्यान त्याने हा गांजा तुळजापूर परिसरातील सोनारी येथील ‘महाराज’ नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ९ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी प्रतिक संभाजी कवडे यांनी फिर्याद दिली आहे. एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories