क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ता. १५ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट -   शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ता. १५ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - 

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ता. १५ जुलै २०२६

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ पैशांच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून 

माळीनगर-देहूगाव येथे पैशांच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १४) पहाटे घडली. या प्रकरणी आरोपी २० वर्षीय धाकट्या भावाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी कुंदन हिरालाल भगत (वय २३) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम राजेंद्र कुदळे (वय २०) याने त्याचा मोठा भाऊ विनायक राजेंद्र कुदळे याची हत्या केली. दोघेही संभाजी टिळेकर यांच्या रूममध्ये, माळीनगर, देहगाव (ता. हवेली) येथे राहत होते.

विनायक याने लोकांकडून उसने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी वारंवार लोक घरी येत असल्याच्या कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापाच्या भरात घनश्याम याने कांदा कापण्याच्या चाकूने विनायकच्या छातीजवळ भोसकून त्याचा खून केला. पोलिसांनी घनश्याम कुदळे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी घनश्यामविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


➡️ मोशीतील बँकेच्या ताब्यातील मालमत्तेत घुसखोरी, दोघांविरुद्ध गुन्हा

 बँकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दांपत्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजय हरिभाऊ शिंदे (वय ३८, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी हरी दत्तात्रय शिंदे (रा. कल्चर क्रेस्ट सोसायटी, सेक्टर क्र. ६, स्पाईन रोड, मोशी) व त्यांच्या पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै ते ६ जुलै रोजी सकाळी ११ या कालावधीत मोशी येथील कल्चर क्रेस्ट सोसायटीतील ए-४ या बँकेच्या ताब्यातील मालमत्तेचे सील तोडण्यात आले. तसेच घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून आरोपींनी अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी बँकेने लावलेला बॅनरही फाडून नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी दांपत्याविरुद्ध मंगळवारी (ता. १४) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ रहाटणीत कारमधून कोयता जप्त, दोघांना अटक

रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मनाई आदेशाचे उल्लंघन करून कारमध्ये लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे आदित्य बाबासाहेब शेंडगे (वय २२, रा. सुनिता अपार्टमेंट, पिंपळे सौदागर) आणि आनंद गोविंद कांबळे (वय २८, रा. बळीराज कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बंटी चहा दुकानासमोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गस्तीदरम्यान संशयितांच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून लोखंडी कोयता आढळून आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपी शस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश रामदास ब्राम्हण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात भारताचा शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गुरव करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ तळेगाव दाभाडेतील लॉजवर छापा, अनैतिक व्यवसायप्रकरणी व्यवस्थापक अटकेत

तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील युवा लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून अनैतिक व्यवसाय उघडकीस आणला. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून लॉज चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १३) सायंकाळी सुमारे ४.२७ वाजता युवा लॉज येथे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस हवालदार श्रद्धा राजेश भरगुडे यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी लॉज मॅनेजर हेमंत नांजे गौडा (वय २३, रा. युवा लॉज, तळेगाव दाभाडे, मूळ रा. कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. तो संबंधित लॉजचा व्यवस्थापक आहे. तसेच लॉज चालक मंजे गौडा (वय अंदाजे ४०) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

 आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणाऱ्या रकमेवर स्वतःची उपजीविका चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान सुमारे ८ हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ भाजीच्या चवीवरून वाद, मजुराला दांडक्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

जेवणासाठी बनविलेल्या बटाट्याच्या भाजीच्या चवीवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या घटनेत एका मजुराच्या ओठाला गंभीर दुखापत होऊन टाके पडले असून हातालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री सुमारे ८ वाजता चाकण (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी रामनिवास बिलाश बरई (वय ४५, व्यवसाय – रंगकाम, सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी मंगळवारी (दि. १४) उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी शैलेश यादव (वय अंदाजे २६) आणि धर्मेंद्र यादव (वय अंदाजे ३०, दोघांचेही पूर्ण पत्ते उपलब्ध नाहीत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, राहत्या ठिकाणी जेवणासाठी बटाट्याची भाजी बनविण्यात आली होती. भाजीची चव चांगली नसल्याने दुसरी भाजी करण्यास सांगितल्याचा राग आरोपी शैलेश यादव याला आला. त्याने आपल्या भावाला धर्मेंद्र यादव याला फोन करून घटना सांगितली. त्यानंतर भावाच्या चिथावणीवरून शैलेश यादव याने फिर्यादीला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या ओठाला गंभीर दुखापत होऊन टाके पडले, तर उजव्या हाताच्या तीन बोटांनाही दुखापत झाली.

या प्रकरणी आरोपींविरोधात उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ४९,३ (५) प्रमाणे, भारतीय दंड विधान कलम ३२४,१०९,३४ प्रमाणे गुन्हा   दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ खेडमधील बहुळ येथे १५ हजार रुपयांचे गावठी दारू निर्मितीचे रसायन जप्त, महिलेवर गुन्हा दाखल

 खेड तालुक्यातील बहुळ गावाच्या हद्दीतील पठारे वस्ती येथे पोलिसांनी कारवाई करून गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले १५ हजार रुपये किमतीचे रसायन जप्त केले. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट (गुन्हे शाखा, युनिट-३, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बहुळ येथील पठारे वस्ती परिसरात कारवाई करण्यात आली. संशयित महिलेच्या ताब्यात दोन निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये एकूण ३०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आढळून आले. या रसायनाची किंमत सुमारे १५ हजार रुपये असून त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व जीवितास धोका निर्माण करणारे घटक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सदर महिला कोणताही परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे रसायन बेकायदा बाळगून त्याची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. त्या महिलेविरुद्ध चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क) व (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories