''आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा''.... प्रलंबित नागरी प्रश्नांसाठी घरकुलवासियांचा महापालिकेवर मोर्चा

''आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा''....  प्रलंबित नागरी प्रश्नांसाठी घरकुलवासियांचा महापालिकेवर मोर्चा

 ''आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा''....

प्रलंबित नागरी प्रश्नांसाठी घरकुलवासियांचा महापालिकेवर मोर्चा 

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - ''आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा''.....अशी जोरदार घोषणाबाजी करत चिखली घरकुल वसाहतीतील रहिवाशांनी बुधवारी (ता. १५) महापालिकेवर मोर्चा काढला. घरकुलमधील सर्व प्रलंबित विकासकामांचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पहिल्याच पावसात एसटीपचे (STP) दूषित पाणी मोठ्या प्रमाणात घरकुल परिसरात शिरल्यामुळे संपूर्ण घरकुल परिसर तब्बल पाच दिवस पाण्याखाली होता. हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, घरे, संसारोपयोगी वस्तू आणि दैनंदिन जीवनाचे मोठे नुकसान झाले. नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय देण्याऐवजी प्रशासनाने दुर्लक्ष केले. प्रशासनाचा या बेफिकीर वृत्तीचा घरकुलवासियांनी निषेध केला आणि त्यांच्या नागरी सुविधांसाठीच्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, घरकुल परिसरातील हजारो नागरिक गेल्या १२ वर्षापासून अत्यंत गंभीर नागरी समस्यांना सामोरे जात आहेत. प्रत्येक पावसाळ्यात प्रशासनाकडून केवळ पाहणी, आश्वासने व तात्पुरती उपाययोजना केली जाते; मात्र आजपर्यंत कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्तांनी तातडीने घरकुलवासियांच्या मागण्यांची दखल घेऊन कार्यवाही करावी. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव, राजेंद्र सावंत, सुग्रीव पाटील, तुषार सोनवणे, प्रकाश परदेशी, रमेश शिंदे, संजय तळेकरी, सुरेश वैरागर, सुरज देशमाने यांनी आंदोलनचे नेतृत्व केले. 

घरकुलवासियांच्या मागण्या पुढीलप्रमाणे -

१. एसटीपी (STP) चे दूषित पाणी घरकुल परिसरात येणे कायमचे बंद करावे.

पहिल्याच पावसात एसटीपीचे दूषित पाणी घरकुल परिसरात शिरल्यामुळे संपूर्ण परिसर अनेक दिवस पाण्याखाली होता. नागरिकांचे मोठे आर्थिक व आरोग्याचे नुकसान झाले. त्यामुळे एसटीपीचे पाणी इतरत्र वळवून या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करावा.

२. घरकुलमधील भाजी मंडई तात्काळ सुरू करावी. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली भाजी मंडई गेल्या ७-८ वर्षापासून वापराविना पडून आहे. ती नागरिक व व्यापाऱ्यांसाठी तात्काळ खुली करावी.

३. सांस्कृतिक भवन तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला सांस्कृतिक हॉल गेल्या ५६ वर्षापासून अपूर्णअवस्थेत आहे. उर्वरित काम पूर्ण करून तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात यावा.

४. व्यायामशाळा सुरू करावी. घरकुल परिसरातील युवक-युव्तींसाठी सुसज्ज व्यायामशाळा सुरू करण्यात यावी.

५. अंगणवाडी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात गोरगरीब कुटुंबातील लहान मुलांसाठी घरकुल परिसरात अंगणवाडी व प्राथमिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

६. मुख्य प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरकुलच्या मुख्य प्रवेशद्वारावर २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा.

७. स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती व स्वच्छता नियमित करावी. पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी लेखी अर्ज करूनही स्टॉर्म वॉटर लाईनची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमित देखभाल करण्यात यावी.

८. पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी. गेल्या ५-६ वर्षांपासून घरकुलमध्ये येणाऱ्या पाण्याला उग्र व दुर्गंधीयुक्त वास येत असून ते पिण्यायोग्य नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासने देण्यात आली. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे.

९. मूलभूत सुविधा न देता कर वसुली थांबवावी अथवा योग्य निर्णय घ्यावा. महापालिका कर वसुलीसाठी आग्रही आहे; मात्र नागरिकांना दर्जेदार पाणी, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, व्यायामशाळा, अंगणवाडी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांवर अन्यायकारक करभार टाकू नये. प्रथम आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

१०. घरकुल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करावा.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories