कचरा विलगीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्यापक जनजागृती

कचरा विलगीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्यापक जनजागृती

कचरा विलगीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्यापक जनजागृती

आता करायचे 'चार-बिन कचरा विलगीकरण', विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर कचरा विलगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात गृहभेटी देऊन नागरिकांना चार-बिन कचरा विलगीकरणाबाबत माहिती देण्यात येत आहे.

घरातून निर्माण होणारा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे ठेवून संबंधित घंटागाडीमध्ये देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. कचरा उघड्यावर टाकणे टाळावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करू नये, याबाबतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

“कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेत कचऱ्याचे विलगीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. घरातूनच कचरा स्वतंत्र केल्यास त्याची पुढील प्रक्रिया अधिक सुलभ आणि शास्त्रीय पद्धतीने करता येते. त्यामुळे नागरिकांनी चार-बिन पद्धतीचा अवलंब करून महापालिकेस सहकार्य करावे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

“कचरा विलगीकरणाची सवय प्रत्येक कुटुंबात रुजणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून जनजागृती करण्यात येत आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास त्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे करता येईल,” असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.

“गृहभेटीच्या माध्यमातून नागरिकांना चार प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि घंटागाडीमध्ये कचरा देण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात येत आहे. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी कचरा विलगीकरणाला प्राधान्य द्यावे,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही मोहीम राबविण्यात येत असून, कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories