पिंपरी | १५ ऑक्टोबर २०२६ : मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित समारोपीय कार्यक्रमात पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, पत्रलेखन, समूह नृत्य आणि पसायदान पाठांतर अशा चार स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला प्रोत्साहन देणे, मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
निबंध लेखन स्पर्धेत समृद्धी अंताळकर हिने प्रथम, प्रतिभा नितीन गायकवाड हिने द्वितीय आणि दिव्या संदीप मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. भावना संजय आनंदपुरे आणि रेहान फय्याज शेख यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
पत्रलेखन स्पर्धेत पार्वती नरेश आठवले हिने प्रथम, अर्णव दत्तात्रय खांडे याने द्वितीय आणि नेहा धनाजी गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळवला. अनन्या गुरुषरण सिंग आणि आस्मी किरण सोळस्कर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
समूह नृत्य स्पर्धेत भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. पीसीएमसी इंग्रजी माध्यम शाळा, भोसरी (मुले) यांनी द्वितीय, तर यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक शाळा क्रमांक १०३, पुनावळे; यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव आणि प्राथमिक कन्या शाळा क्रमांक १०३, पुनावळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
पसायदान पाठांतर स्पर्धेत श्रीपाद भागवत सावंत याने प्रथम, राजलक्ष्मी उमेश आरदवाड हिने द्वितीय आणि श्रेया सुजित तापकिरे हिने तृतीय क्रमांक मिळवला. योगेश ज्ञानेश्वर सोरमारे आणि आयशा संतोष गौतम यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
विशेष म्हणजे, समूह नृत्य स्पर्धेत १५ शाळांमधील २२३ विद्यार्थी आणि ३० शिक्षकांनी सहभाग घेतला. तर पसायदान पाठांतर स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमाला महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रेक्षागृह व्यवस्थापक विकास वेताळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष किशोर बारकूले आणि सदस्य तुषार झरेकर यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी भाषेचा अभिमान आणि तिचा साहित्यिक-सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.