news
clock
शहरातील प्रत्येक गुणवंताला महापालिका नेहमीच प्रोत्साहन देईल - महापौर रवी लांडगे

शहरातील प्रत्येक गुणवंताला महापालिका नेहमीच प्रोत्साहन देईल - महापौर रवी लांडगे

 शहरातील प्रत्येक गुणवंताला महापालिका नेहमीच प्रोत्साहन देईल - महापौर रवी लांडगे

 ८४ वर्षांचे प्रसिद्ध सायकलपटू विष्णुपंत बेलापूरकर व शहरातील खेळाडूंचा महापालिकेकडून सन्मान

पिंपरी, ता. २८ - ''पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठांचा अनुभव, त्यांची जिद्द आणि समाजाशी असलेली नाळ ही आपल्या शहराची अनमोल ताकद आहे आणि नवीन पिढी म्हणजे शहराच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहे. या सर्वांचा सन्मान हा त्यांच्या यशाचा गौरव आहे आणि संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गुणवंताला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील.'', अशी भावना महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केली. 

नुकत्याच झालेल्या पुणे सायकल ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने चर्चेत आलेले भोसरी येथील ८४ वर्षांचे प्रसिद्ध सायकलपटू अशोक विष्णुपंत बेलापूरकर तसेच लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी राम मुगदुस, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदविणारा ५ वर्षांचा तेजस जोशी यांचा सन्मान महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते महापालिका भवनामध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

या समारंभास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांनी ३५ वर्षापूर्वी बेलापूरकर यांची सायकलची आवड पाहून त्यांना सायकल भेट दिली होती. तीच सायकल ते आत्तापर्यंत वापरत होते सायकलवरुन गेल्या ७० वर्षात लाखो किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे. वारकरी असलेल्या बेलापूरकर यांनी सायकलवरुन आळंदी ते पंढरपूर अशी अनेक वर्ष वारी केली आहे. तसेच विविध राज्यांचा प्रवास देखील त्यांनी सायकलवर केला आहे, याशिवाय ते “सायकल चालवा -पर्यावरण वाचवा”  आणि “झाडे लावा – झाडे जगवा” अशा सामाजिक कार्याचाही प्रचार करतात अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. महापौरांनी  रवि लांडगे बेलापूरकर यांना सायकल भेट दिली. 

खेळाडूंविषयी - 

- लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील माध्यमिक विद्यालय केशवनगर शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी राम विक्रम मुगदुस याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील लॉन टेनिस च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देखील तो सहभागी होणार आहे.

- रावेत येथील अवघ्या ५ वर्ष २ महिन्याचा तेजस जोशी याने इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदवून शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे यासाठी त्यांचे आई वडील रेखा व नीलम जोशी यांनी त्याला मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories