जुन्या भांडणाच्या रागातून पिंपरीगावात युवकावर कोयत्याने हल्ला, एक जखमी, दोघांना अटक
पिंपरी, ता. २८ - जुन्या भांडणाच्या रागातून पिंपरीगावातील ग्रीन पार्क परिसरात १९ वर्षीय युवकावर दोघांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला युवक कोयता लागून जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) रात्री १० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, २६ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ग्रीन पार्क, पिंपरी गाव येथे फिर्यादी धिरज विशाल उल्लारे (वय १९) व त्याचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी ओम विलास गोटे (वय १८) व सुरज सोनु वाल्मिकी (वय १९) हे त्यांच्या एका मित्रासह तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरुन त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली.
दरम्यान, आरोपी ओम गोटे याने आपल्या जवळील कोयता काढून फिर्यादीला धमकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र वैभव विठ्ठल भाईकट्टी याने त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडताच आरोपीने त्याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात वैभव भाईकट्टी जखमी झाला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २७) भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५), भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.