आषाढी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या तत्पर आरोग्यसेवेसाठी महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज
आषाढी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या तत्पर आरोग्यसेवेसाठी महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज
प्रमुख पालखी मार्गांवर ७ वैद्यकीय पथके, ७३ अधिकारी-कर्मचारी, २४ तास रुग्णवाहिका व आरोग्यसेवेची व्यापक व्यवस्था
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - आषाढी पालखी सोहळा २०२६ निमित्त लाखो वारकरी पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गक्रमण करणार असून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यापक नियोजन केले आहे. वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रथमोपचार किट, कार्डियाक रुग्णवाहिका तसेच स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत एकूण ७ वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून त्यामध्ये ७३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एम.पी.डब्ल्यू., वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक तसेच आशा स्वयंसेविका यांचा समावेश आहे. तसेच पालखी सोहळ्याचे कामकाज सुरळीत व समन्वयाने पार पाडण्यासाठी प्रत्येक रुग्णालय स्तरावर झोनल अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांचाही विचार करून पालखी मार्गावर १,९२५ शौचालये आणि ६२५ स्नानगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच दिंडी प्रमुखांना आवश्यक उपचार तातडीने करता यावेत यासाठी १,५०० प्रथमोपचार किटचे वितरण करण्यात येणार आहे.
🔴 जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील व्यवस्था
➡️ दिनांक ८ जुलै २०२६ रोजी निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. या पालखी मार्गावर एकूण ६ वैद्यकीय पथकांमध्ये ५१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
- आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर पालखी मुक्कामस्थळी २४ तास वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे. तसेच कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी येथे पार्किंग परिसरात २४ तास बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय खंडोबामाळ, आकुर्डी येथे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सहकार्याने कार्डियाक रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
➡️ दिनांक ९ जुलै २०२६ रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असताना चिंचवड स्टेशन येथे तालेरा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जिजामाता रुग्णालय, वल्लभनगर येथे सांगवी रुग्णालय, नाशिक फाटा येथे वायसीएम रुग्णालय आणि सीएमई, दापोडी येथे थेरगाव रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
🔴 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील व्यवस्था
➡️ दिनांक - ९ जुलै २०२६ रोजी वडमुखवाडी येथील साई मंदिर येथे नवीन भोसरी रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच मॅगझीन चौक, दिघी येथील स्वागत कक्षात नवीन भोसरी रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असून येथे २२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय केएलई मेडिकव्हर रुग्णालय, भोसरी यांच्या सहकार्याने कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर दिघी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दिघी यांच्याकडूनही रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
🟩 रुग्णालय क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
आषाढी पालखी सोहळा आणि आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवांचा प्रभावी समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेने प्रमुख रुग्णालयांसाठी स्वतंत्र झोनल अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
डॉ. हरिदास शेंडे (कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी), डॉ. सचिन शिनगारे (नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी), डॉ. नंदकुमार मोरे (क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तालेरा रुग्णालय, चिंचवड), डॉ. तुषार जाधव (नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव), डॉ. शितल शिंदे (नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी), डॉ. वैशाली भामरे (स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृह, सांगवी रुग्णालय) आणि डॉ. विद्याधर फल्ले (यमुनानगर रुग्णालय) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अधिकारी पालखी सोहळा तसेच आपत्कालीन परिस्थितीत २४ तास वैद्यकीय सेवांचा समन्वय आणि देखरेख करणार आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार असून, पालखी सोहळ्यादरम्यान येणाऱ्या वारकरी आणि नागरिकांच्या उपचारासाठी प्रत्येक रुग्णालयात किमान १० टक्के खाटांची व्यवस्था राखीव ठेवण्यात येणार आहे. रुग्णालय आणि दवाखाना स्तरावर वैद्यकीय पथके व रुग्णवाहिकांची पूर्ण व्यवस्था ठेवण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये आणि इतर विभागांच्या समन्वयातून तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रमुख पालखी मार्गांवर वैद्यकीय विभागाच्या वतीने दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार पेट्यांचे वितरण करण्यात येणार असून, त्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क विभागाच्या समन्वयाने केली जाणार आहे.
सध्याच्या पावसाळी परिस्थितीचा विचार करून पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. मदत व बचाव कार्यात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी नियुक्त झोनल व नोडल अधिकाऱ्यांना समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
🟩 अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे....
"आषाढी पालखी सोहळा आणि सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वारकरी, भाविक तसेच पूरग्रस्त नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रत्येक रुग्णालय स्तरावर नियोजन करण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे."
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
🟩 वैद्यकीय विभाग पूर्णपणे सज्ज.....
"महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा तसेच पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय विभाग पूर्णपणे सज्ज आहे."
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.