पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेने नाममात्र दरात टँकरने पाणीपुरवठा करावा, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची आयुक्तांकडे मागणी
Jun 01 2026
79
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेने नाममात्र दरात टँकरने पाणीपुरवठा करावा, नगरसेविका श्रुती वाकडकर यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागांतील नागरिकांना पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नाममात्र दरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या श्रुती वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून त्यासाठी दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. यामध्ये एक बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की, खासगी टँकर चालकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असून ते संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असल्याने, महानगरपालिकेनेही आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर टँकर उपलब्ध करुन नागरिकांना खाजगी टँकरपेक्षा नाममात्र दरात पाणीपुरवठा करावा.
शहरातील पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत महानगरपालिकेने ही विशेष उपाययोजना राबवावी. टंचाईग्रस्त भागांमध्ये सवलतीच्या दरात टँकरने पाणी उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करुन तातडीने कार्यवाही करावी, असे वाकडकर यांनी म्हटले आहे.

- पाणी संकट, Water crisis, शहरी पाणीपुरवठा, Urban water supply, खासगी टँकर, Private water tankers, पाणी व्यवस्थापन, Water management
- दैनंदिन पाणीपुरवठा, Daily water supply, नगरसेविका श्रुती वाकडकर, Corporator Shruti Wakadkar, महापालिका आयुक्त, Municipal Commissioner
- टँकर पाणीपुरवठा, Water tanker supply, नाममात्र दर, Nominal charges, पिण्याचे पाणी, Drinking water,
- पाणीटंचाई, Water shortage, पिंपरी-चिंचवड, Pimpri-Chinchwad, महापालिका, Municipal Corporation,