ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश
ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश
पिंपरी, ता. १ - ताथवडे, पुनावळे आणि वाकड या परिसरातील तीन महत्त्वाच्या सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. ३०) दिले. याबाबतची सविस्तर माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील प्रलंबित कामांविषयी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित रहात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील (पुणे पश्चिम बायपास) वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांकडे आमदारांनी लक्ष वेधले. सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे अंडरपास, पुनावळे अंडरपास, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी अंडरपास या परिसरांमध्ये सध्याच्या भुयारी मार्गांची क्षमता अतिशय कमी आहे. परिणामी, सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्णत्वाला नेणे गरजेचे आहे, हीच मागणी जगताप गडकरी यांच्याकडे मांडली.
जगताप यांनी केलेल्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेऊन गडकरी यांनी ताथवडे, पुनावळे आणि वाकड या परिसरातील तीन महत्त्वाच्या सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ताथवडे आणि पुनावळे येथील अंडरपासमधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे अंडरपास रुंद करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे गडकरी यांनी सांगितले आहे. पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत या प्रमुख जंक्शन्सवरून रोज लाखो वाहनांची आणि जड मालवाहतुकीची ये-जा सुरु असते, त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्स आणि नवीन अंडरपास बांधण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारत्मकता दर्शवली आहे.
रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद...
“ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील अंतर्गत वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सेवा रस्ते आणि अंडरपासचे रुंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना आणि आयटी क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.”
— शंकर जगताप, आमदार