पिंपरी | १६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. वैभव म्हस्के हे कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याची बाब रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकारामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली.
रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अहवाल आणि त्यावरील अभिप्राय विचारात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १६ ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी केले.
डॉ. म्हस्के हे महापालिकेच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आहेत. कर्तव्यावर असताना मद्याच्या प्रभावाखाली राहणे आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होणे हे शासकीय सेवकांसाठी निर्धारित आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ आणि २८, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६(१) यांचा भंग झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने निलंबन आदेशात नोंदवला आहे.
संबंधित सेवा नियमांनुसार डॉ. म्हस्के यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशीतून पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.
निलंबन कालावधीत डॉ. म्हस्के यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार आहे. मात्र, या काळात त्यांना अन्यत्र नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. त्याबाबतचा स्वाक्षरीयुक्त दाखला दरमहा २० तारखेच्या आत सादर करावा लागणार आहे.
तसेच निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पिंपरी येथेच राहणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
महापालिका प्रशासनाने या प्रकरणी सेवा नियमांनुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू केली असून, विभागीय चौकशीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.