नवी सांगवी | 8 सप्टेंबर 2026 : बँक खात्यात आणि पेट्रोलपंपावरील कार्ड व्यवहारातून पैसे जमा करून त्याबदल्यात रोख रक्कम घेत पेट्रोलपंप व्यवस्थापकासह त्यांच्या सहकाऱ्याची एकूण 1 लाख 8 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
उद्धव मोतीराम गाजरे (वय 37, व्यवसाय—पेट्रोलपंप व्यवस्थापक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 ते 7 सप्टेंबरदरम्यान नवी सांगवीतील शितोळे पेट्रोलपंपावर घडल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
आरोपींनी तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे आवश्यक असल्याचे तसेच फायनान्स कंपनीने वाहन ताब्यात घेतल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक खात्यात 41 हजार 200 रुपये जमा करून तेवढी रोख रक्कम घेतली.
तसेच फिर्यादीच्या सहकाऱ्याच्या पत्नीच्या खात्यात आणि पेट्रोलपंपावरील कार्ड व्यवहारातून अनुक्रमे 30 हजार, 7 हजार आणि 30 हजार रुपये जमा करण्यात आले. त्या बदल्यात 67 हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप आहे.
अशा प्रकारे एकूण 1 लाख 8 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.