पिंपळे सौदागर परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या रखडलेल्या कामाला सुरवात
Mar 20 2026
66
पिंपळे सौदागर परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या रखडलेल्या कामाला सुरवात
‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे रखडले होते काम, स्थानिक नगरसेवकांचा पाठपुरावा
पिंपरी, ता. २० - पिंपळे सौदागर परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या १८ मीटर ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला शुक्रवारी (ता. २०) सुरवात झाली. त्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनी पाठपुरावा केला.
‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जातो. अनेक गृहप्रकल्पांना जोडतो. मात्र, जमिनीचे अधिग्रहण, तांत्रिक त्रुटी आणि इतर काही कारणांमुळे या १८ मीटर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम प्रलंबित होते. रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास आणि वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार बैठका घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन सर्व अडथळे दूर केले.
यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, ''निवडणूकीदरम्यान ट्रायोज आणि झूलेलाल टॉवर्स सोसायटी रहिवासी आणि सौदागरच्या नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून आज समाधान वाटत आहे. ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता हा केवळ सिमेंट-काँक्रीटचा रस्ता नसून तो या भागातील दळणवळणाची ‘लाईफलाईन’ आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते. आम्ही प्रशासनाशी सतत संवाद साधून आणि पाठपुरावा करुन आज हे काम मार्गी लावले आहे. जलद गतीने व दर्जेदार असे हे काम पूर्ण करुन हा रस्ता लवकरच नागरिकांसाठी खुला होईल.''