अभय योजनेद्वारे तब्बल ८० कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा
३१ मार्च २०२६ पर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
पिंपरी, ता. २० - ''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अभय योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम तब्बल ८० कोटींहून अधिक आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ (रात्री १२ पर्यंत) सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरुन योजनेचा लाभ घ्यावा.'', असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक आहे.
अभय योजना लागू झाल्यापासून १ मार्च २०२६ (सकाळी १० पासून) ते २० मार्च २०२६ (दुपारी १२ पर्यंत) या २० दिवसांच्या काळात तब्बल २७ हजार ८४० मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत ८० कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना १९ कोटी १५ लाखांची सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले आहे. तसेच काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नसून, अशा मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’चा लाभ घेऊन ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत मालमत्ता कर भरून विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे राहणार खुली
महानगरपालिकेने शनिवार, रविवारसह दिनांक २१ मार्च रोजी रमजान ईद, दिनांक २६ मार्च रोजी श्री राम नवमी आणि ३१ मार्च रोजी महावीर जयंती अशा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे. तसेच कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील.
‘अभय योजने’ला मोठा प्रतिसाद
महानगरपालिकेच्या ‘अभय योजने’ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीमुळे थकबाकीदारांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. मात्र अजूनही काही मालमत्ताधारकांकडून थकीत कराचा भरणा झालेला नाही. अशा सर्वांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत रक्कम एकरकमी भरून या योजनेचा लाभ घ्यावा. महापालिकेकडून ऑनलाइन सुविधा तसेच सर्व कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली असून, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ही केंद्रे खुली राहणार आहेत. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा
-डॉ. विजय सूर्यवंशी , आयुक्त , पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
३१ मार्चपूर्वी अभय योजनेचा लाभ घ्यावा
महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’ला नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रशासनावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, थकीत मालमत्ता करावरील विलंब शुल्कात मोठी सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडे अद्याप थकीत मालमत्ता कर बाकी आहे, त्यांनी ३१ मार्चपूर्वी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक बचत करावी.
- रवी लांडगे, महपौर , पिंपरी-चिंचवड महानगरपालिका